Wednesday 1 April 2020

कर्माचा सिद्धांत (2020)


कर्म आणि पुनर्जन्माविषयी मौलिक विचार ही भारतीय दर्शनाची मोलाची देणगी आहे. कर्मगती फार गहन - गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. एक माणूस सुखी तर दुसरा दु:खी - असें कां? जे लोक सदाचारी, पापभीरू, प्रामाणिक जीवन आचरीत असतात, ते दु:खी जीवन भोगीत असतात याउलट सुखासीन आयुष्य जगणारा सदाचारी असतोच असे नाही, जगात असा विरोधाभास पहिला, की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते, वाटू लागते की ईश्वराच्या राज्यांत काही न्याय - नीती आहे कां? का सगळीकडे अंधेर नगरीच आहे? पण वस्तुस्थिती अशी आहे कीं ईश्वरी राज्यांत अंधारही नाही वा अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात यावयास, कर्म - फल नियमांचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.

स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे, आपण सर्व जसे आहोत आणि जे काही होऊ इच्छीतो त्यास आपण स्वत: जबाबदार आहोत. आज आपण जसे आहोत तो जर आपल्या पुर्वकर्माचा परिणाम असला तर त्यातून नक्की फलित होते की भविष्यात आपण जे काही होऊ इच्छितो ते आपल्या आजच्या कर्मातून निर्माण होऊ शकते, आणि म्हणूनच जगताना आपली भूमिका काय आणि कशी असावी याचे ज्ञान आपणास असणे आवश्यक आहे.


गीताभ्यास – कर्म आणि कर्मफळ


‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे.

‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं, कधी मिळेल यावर तुमचा हक्क नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असं म्हणणं जास्त उचित.
आत्म्याची अमरता व स्वधर्मपालन याविषयीचं मार्गदर्शन करून भगवंतांनी अर्जुनाला ‘लढणं’ हेच तुझं कर्तव्य आहे, तोच तुझा धर्म आहे, हे सांगितल्यानंतरही आपल्या हातून आप्त-गुरुजनांचा मृत्यू घडल्यास आपल्याला घोर पाप लागेल, ही अर्जुनाच्या मनाची धारणा त्याला त्रास देत होती. निर्णय घेण्यापासून परावृत्त करत होती.
अर्जुनाची ही मनस्थिती पाहून भगवंतांनी त्याला पुन्हा समजावलं. भगवंत म्हणाले, ‘‘अर्जुना, अरे पाप-पुण्य, जय-पराजय या गोष्टी युद्धाच्या अंती परिणामांच्या रूपाने समोर येतील. युद्ध सुरू होण्याच्या आधीच परिणामांच्या विचाराने तू हताश झालास तर तुझी युद्धकर्तव्यातील एकाग्रता नाहीशी होईल. युद्धाच्या वेळी अशी अस्थिर मनोवृत्ती असणं चांगलं नाही. मनाचा समतोल ठेवून युद्ध कर. तुझ्या  हातून घडणारं युद्धासारखं कर्मसुद्धा ‘कर्तव्य व स्वधर्मपालन’ असल्याने त्याचं तुला पातक लागणार नाही. तू कर्मबंधातून सुटशील.’’
या ठिकाणी भगवंत ‘कर्मबंध’ असा शब्द वापरत आहेत. कर्माचं बंधन म्हणजे कर्मबंध. कर्माचा साधा अर्थ आहे कोणतीही क्रिया! प्रत्येक कर्माचं फळ ठेवलेलंच आहे, असा कर्माचा सिद्धांत आहे. हेच त्याचं बंधन आहे. कर्मावर आधारित एक फार प्रसिद्ध श्लोक गीतेत आहे :
   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥

साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. पण खरं तर या श्लोकात जो ‘अधिकार’ हा शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. गीता सांगते, ‘‘तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे. कोणतं कर्म करायचं? कसं करायचं? हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं व कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क चालत नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असे म्हणणे उचित ठरेल
खरं तर, सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो, तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळवण्याची अपेक्षा असते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासूनसुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते. इतर सर्व कामंसुद्धा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा फळांसाठीच केली जातात. काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही. म्हणजेच फळाची आशा असतेच!
मग हा श्लोक काय सांगतो? फळाची चिंता करता करता काम करायला लागाल तर प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष होईल. तुम्हाला जे फळ अपेक्षित आहे ते तसंच मिळण्यासाठी तुमचं कर्म त्या फळाच्या कसोटीला उतरेल इतकं व्यवस्थित व्हायला हवं. भविष्याच्या काळजीपायी वर्तमानाकडे लक्ष रहाणार नाही. शिवाय जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्यावर विचार करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करा. जसं कर्म तसं फळ मिळेलच. चांगल्या कर्माचं चांगलं फळ उपभोगायचं तर वाईट कर्माची वाईट फळं भोगायची. या कर्माच्या सिद्धांतापासून सुटका नाही. हे माहीत असल्यामुळेच नरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनाची अशी स्थिती झाली होती.

गीतेला मनुष्यप्राण्याची गमतीशीर मनोवृत्ती चांगलीच माहीत आहे. म्हणून श्लोकाच्या दुसऱ्याच ओळीत भगवंत बजावत आहेत की, फळाकडे ध्यान द्यायचं नसेल तर काही कर्मच करायचं नाही, असंही तू करू नकोस. कारण कोणीही कर्म केल्यावाचून क्षणभर राहू शकत नाही. तेव्हा कर्मच न करणं हा विचार चुकीचाच आहे. अशा परिस्थितीत काही जण म्हणतील की आम्ही कर्म करणार आणि फळं चाखणार. काही म्हणतील की फळ मिळणार नसेल तर कर्मच करणार नाही. गीता सांगते, ‘कर्म तर कराच, पण फळ सोडा. फळाची आसक्ती फळावरचं ध्यान, चिंतन सोडा. कुठल्याही बाजूचं फळ मिळालं तरी मनाचा तोल ढळणार नाही अशी मनाची तयारी करा. जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने विचलित होणार नाही अशी सम-भावना मनात ठरवून घ्या.
अशा प्रकारे गीता, मानवी मनाच्या विकासाची एक पायरी सांगते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानराचा नर झाला आणि शारीरिक विकास परिपूर्ण झाला. इथून पुढे विकास व्हायला हवा तो मानसिक-तरच नराचा नारायण होईल. गीता आपल्याला या मार्गाची ओळख करून देते. अपेक्षा न ठेवता कर्म करीत रहाणं व फळाची आशा न ठेवणं हा मानसिक विकासाचा टप्पा आहे.

मनात कुठलीही कामना न धरता जेव्हा कार्य केलं जाईल तेव्हा ते निष्काम कर्म होईल. गीता निष्काम कर्माला महत्त्व देते. मनातील कर्तव्याची इच्छा आणि बुद्धीचा त्या दृष्टीने वापर अशी सांगड घालून एकाग्रतेने व कौशल्याने कर्म कराल तर बुद्धी कर्माशी साधली जाईल. योगबुद्धी होईल. कारण ‘योग’ म्हणजे सांधणे-जोडणे. कर्मापेक्षाही कर्म करताना कोणत्या विचाराने किंवा हेतूने कर्म युक्त आहे हे महत्त्वाचे असते.
या ठिकाणी गीता ‘योग’ या शब्दाच्या दोन सुंदर व्याख्याच सांगते. ‘समत्व योग उच्यते’ आणि योग कर्मसु कौशलम्’! समतोल व स्थिर बुद्धी असेल तर कर्म कौशल्यपूर्ण आपसूक होईल. योग साधेल.
माणसाला जीवनात सुख व शांती यांचीच आस असते. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. पण मनाची शांती तेव्हाच मिळेल जेव्हा भविष्यकाळाची चिंता नाहीशी होईल. ‘आपण आपलं काम नीट करू , मग काय व्हायचं ते होईल,’ अशी मनाची धारणा एकप्रकारची शांती देईल. आपली इंद्रियं सतत वखवखलेली असतात. त्यावर थोडा काबू ठेवला की आपोआप गरजा, अशांती, चिंता या गोष्टींपासून सुटका होईल. अशा तऱ्हेने मनोवृत्ती विकसित करता येईल व मनाला, बुद्धीला स्थिरता येईल.

भगवंत सांगतात, की ‘अशा समबुद्धीने व स्थिर चित्ताने कर्तव्य करणारे लोकच कर्मबंधातून मुक्त होतात. निष्काम कर्म कर, असे झाल्यास तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. निष्काम कर्म, स्वधर्मपालन, समतोल व संयमी बुद्धी, इंद्रियांवर पूर्ण ताबा, काम-क्रोधावर विजय या सर्व गोष्टींमुळे तू पूर्ण स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ होशील व तुला ‘ब्राह्मी’ स्थिती प्राप्त होईल.   




कर्मयोग म्हणतो की, ‘निरंतर कर्म करा. परंतु कर्मावरील आसक्तीचा त्याग करा.’ कशाशीच एकजीव होऊन जाऊ नका, कशालाच चिकटून राहू नका. मन स्वाधीन ठेवा. आपल्या आयुष्यातील दुख,  कष्ट या पैकी काहीच चिरस्थायी नाही. दारिद्रय, समृद्धी, सुख इत्यादी सर्वच क्षणिक आहे. त्याचा आपल्या खऱ्या स्वरूपाशी काहीच संबंध नाही. स्वरूपत आपण सुखाच्या आणि दुखाच्या, प्रत्यक्षाच्या किंवा कल्पनेच्या अगदी पलीकडचे आहोत आणि तरीही आपल्याला अखंड कर्म आचरीत गेलेच पाहिजे- नान्य पन्था!’    
-स्वामी विवेकानंद   


श्रेष्ठ कोण? कर्म / श्रेष्ठ कोण? कर्म की नशीब?

कर्म आणि नशीब एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नशीब बदलता येत नाही, हे खरे! पण कर्मामुळे नशीब घडवता येते. आता प्रश्न उपस्थित होतो, कसे? या प्रश्नाच्या उत्तराआधी आपल्याला कर्म-सिद्धांत आणि नशीब दोन्ही समजून घेणे अावश्यक आहे.
भारतीय परंपरेत अशी धारणा आहे की, मनुष्य कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे; परंतु त्याच्या कर्माचे फळ त्याला स्वत:ला भोगावे लागते. वैदिक काळापासून हे चालत आलेले आहे की, चांगले कर्म करणा-यास सद््गती मिळते, तर वाईट कर्म करणा-याची दुर्गती होते. पुराणे आणि गं्रथांतही यावर विस्तृत माहिती दिली आहे की, कोणता यज्ञ केल्याने फळ कसे प्राप्त होते. यासंदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, वरील समजुतीनुसार व्यक्ती कर्म करण्यास मुख्त्यार आहे; परंतु कर्म-फळ वेगवेगळे नाही. कर्म-फळ तर केलेल्या कर्माचा अपरिहार्य परिणाम आहे. कर्मानुसारच त्याचे फळ मिळते. चांगल्या कर्माचे चांगले, तर वाईट कर्माचे वाईट फळ मिळते; परंतु कर्माचे फळ तर मिळणारच.
कर्म-फळ-संबंध नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्या प्रकारे भौतिक जग कार्यकारणभावाने बांधले गेले आहे त्याच प्रकारे नैतिक जगत कर्म-फल-संबंधाने बांधले गेले आहे. यालाच कर्मवादाचा सिद्धांत किंवा कर्मगती, असे म्हटले जाते. सूरदास, मीरा, कबीर, तुलसी आदी संतकवींनी या धारणेचा सुस्पष्ट रूपात उल्लेख केला आहे की, "कर्मगति टारे नही टरै। जो जस करै, सो फल चाखा' नैतिकतेच्या दृष्टीने कर्म-फल-संबंध दृढ असावेत म्हणजेच कर्मानुसारच फळ मिळावे. त्यामुळे कर्म कधी विनाफळ राहत नाही. शुभ -अशुभ, दोन्ही कर्मांची फळे मग ती शुभ असो की अशुभ, दोन्ही कर्मांची फळे व्यक्तीला भोगावीच लागतात.
आता प्रत्यक्षात कर्म सिद्धांत म्हणजे काय? व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे का? अथवा त्याच्या द्वारे केली गेलेली सर्व कर्मे ईश्वर किंवा अन्य अदृश्य शक्तीकडून पूर्वनिर्धारित आहेत काय? या संबंधात माझ्या मते व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे. कारण जर व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र नसेल तर त्याला कोणत्याही कर्मासाठी जबाबदार धरता येणार नाही. कर्म-स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्वात अनिवार्य संबंध आहे. जर एखादी व्यक्ती मजबुरीने कोणते कर्म करते तर त्याला त्या कर्मासाठी जबाबदार धरता येणार नाही. हे सांगण्याचे तात्पर्य असे की, त्याला त्या कर्मासाठी दंड ठोठावता येत नाही किंवा शाबासकीही देता येत नाही. हे तर सर्वश्रुत आहे की, कर्माचे फळ त्याच्या कर्त्यास मिळते. कर्माची अवस्था आणि फळाची अवस्था एकाच वेळी मिळत नाही. कधी कधी दोहोत खूप अंतर असते, तर कधी थोड्या वेळाचे अंतर असते. पण, काहीना काही वेळ तर लागतोच. जर कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्त्याहून वेगळा असेल तर कर्म करणा-यास त्याचे फळ मिळत नाही. कर्माचे फळ कर्माच्या कर्त्यास मिळालेच पाहिजे. अन्यथा कर्मफळांचा संबंध निरर्थक ठरेल. तरीसुद्धा, कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्ता दोन्ही प्रत्यक्षात एकच व्यक्ती असते, हे मानावेच लागते. आत्मा हाच कर्ता आहे, नित्य आहे. तो परिवर्तनशील नाही. जर कर्माचा कर्ता फळाच्या वेळी बदलला तर फळाचा भोक्ता कोण असेल? अशा परिस्थितीत दोन प्रकारचे दोष असण्याची शक्यता आहे, कृत प्रणाश (केलेल्या कर्माचा नाश), अकृताभ्युगम (अकृत कर्माचे फळ). सांगण्याचे तात्पर्य असे की, कर्माच्या फळाचा नाश होत नाही आणि अकृत कर्माचे फळही मिळत नाही. कर्म आणि फळाचा व्यवच्छेदक संबंध आहे. आपल्या सध्याचे आयुष्य म्हणजे गेल्या जन्मातील फळे असतात आणि यानंतर मिळणा-या जन्मास वर्तमान जन्माचे प्रतिफळ समजावे. जे कर्म स्वइच्छेने केले जाते, त्याचे फळ कर्त्यास मिळते. जर कोणी चोरी करू इच्छित नसेल तर काही लोक त्याला चोरी करण्यास मजबूर करतात. तर त्याला त्या चोरीचे फळ मिळणार नाही. व्यवहारात कधी कधी कर्म आणि फळाच्या संबंधात परस्परविरोध दिसून येतो. शुभ कर्म करणा-याच्या नशिबी दु:ख येते आणि अशुभ कर्म करणारा माणूस सुख उपभोगतो. वास्तविक पाहता, कर्मासंबंधात असा विरोधाभास नाही. कर्माचे तीन प्रकार आहेत. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि संचयीमान कर्म. प्रारब्ध कर्म भूत (गेल्या) जन्माचे कर्म आहे. त्याचे फळ वर्तमानात मिळते आहे. संचितकर्म म्हणजे, ज्याचे फळ तेव्हा मिळेल, जेव्हा प्रारब्ध कर्माचे फळ समाप्त होईल. संचयीमान कर्म वर्तमान जीवनातील कर्म आहे. याचे फळ भोगण्याची अजून प्रतीक्षा आहे. फळ भोगात तारतम्यता आहे. नशिबानंतर संचित किंवा संचितानंतर संचयीमान कर्माची फळे भोगावे लागतात. याला कारण वर्तमान जीवनात शुभ कर्म करणारा व्यक्ती दु:ख सोसत असतो. हे दु:ख त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या अशुभ कर्माचे फळ आहे. कर्म-फळ-संबंध कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून नाही. इच्छा असूनही त्याला वर्तमान शुभ कर्माचे सुखद फळ त्याला पूर्वजन्माची फळे भोगल्याशिवाय प्राप्त होणार नाही. क्रियमाण कर्माचे फळ अजून मिळालेले नाही, पण जरूर मिळेल. मग मृत्यूनंतर पुनर्जन्मात का असेना, पण त्याला ते मिळेल. जर अशुभ कर्म करणारा सुख भोगत असेल तर आणि शुभ कार्य करणारा
दु:ख भोगत असेल तर पहिल्या व्यक्तीचे नशीब चांगले आणि दुस-याचे वाईट, अशी आमची समजूत अधिक दृढ होईल.
यावरून हे तर स्पष्ट होते की, जो व्यक्ती जसे कर्म करतो तसेच फळ त्याला मिळते. अर्थात कर्माचे स्वरूप त्या व्यक्तीचे नशीब घडवते. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती सदाचरण करत असेल तर त्याच्या फळस्वरूप सुख त्याचे नशीब बनते. याच प्रकारे त्याच्याकडून वर्तमान जीवनात केले गेलेले सदाचरण त्याच्या भावी सुखी जीवनाचे अाधार बनते. अशा प्रकारे व्यक्ती कर्म करण्यास स्वतंत्र आहे, मग तो सत्कर्म करो की दुष्कर्म; परंतु त्याच्या दोन्हीचे परिणाम (फळ) ठरलेले आहेत. त्यावर व्यक्तीचे नियंत्रण नसते. सत्कर्माचे फळ चांगले आणि दुष्कर्माचे फळ वाईटच मिळेल. भगवद््गीतेतही हेच स्पष्ट केलेले आहे-
कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन।
शेवटी असे म्हटले जाऊ शकते की, कर्मच श्रेष्ठ आहे. कर्मच कर्तव्य आहे, कर्मच ईश्वर आहे, तसेच कर्मच पूजा आहे. व्यक्ती स्वत: आपले भाग्य घडवतो. नशीब बदलता येत नसले तरी कर्मापासून नशीब घडवले जाऊ शकते.